कहाणी एका अत्यवस्थ राजकीय पक्षाची.. - दर्पण

Friday, May 21, 2021

कहाणी एका अत्यवस्थ राजकीय पक्षाची..

अस म्हणतात की, व्यक्ती, समाज अथवा देशाने इतिहासातून शिकावे त्यामुळे वर्तमान सुधारतो व परिणामी भविष्यकाळ सुरक्षित समृद्ध होतो. याउलट इतिहासाचे विस्मरण झाले किंवा इतिहासात केवळ रमले तर वर्तमान हातातून निसटून जातो व वर्तमानाचे भान नसले की भविष्य अंधकारमय होते. कॉंग्रेस पक्षाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.

नुकात्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकात पक्षाचा दारुण पराभव झाला. त्याची कारणमिमांसा करण्यासाठी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाच सदस्यीय समिती नेमली आहे. हा प्रकार म्हणजे ऑक्सिजनअभावी अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला सर्दी तापाचे औषध देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे रुग्णाचे काय हाल होत असतील ते वेगळे सांगायची गरज नाही.

इतिहासाचे विस्मरण

देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने केले. तत्कालीन कॉंग्रेस मुळे देशातील सर्वसामान्य नागरिकाला स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होता आले. याचे महत्वाचे कारण म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाची मांडणी करून जनमानस एकत्र केले. ब्रिटिशांविरोधात स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य असा चतु:सूत्री कार्यक्रम राबवला व त्यामुळे ते भारतीय असंतोषाचे जनक ठरले. नागरिकांचे एकत्रीकरण करण्यास सर्वात मोठा अडथळा होता तो हिंदू- मुस्लीम मधील तणाव. हिंदू मुस्लीम तणाव निर्माण करून ब्रिटीश आपले  शासन मजबूत करत आहे हे ओळखून त्यांनी हिंदू मुस्लीम मधील मतभेद संपवून त्याना स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय करण्यासाठी लखनौ करार केला. विशेष महत्वाची बाब म्हणजे यासाठी त्यांनी मुस्लीमांचे लांगुलचालन नाही केले. टिळकांच्या पश्चात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केलेल्या महात्मा गांधीनी रामराज्याची कल्पना मांडली. म्हणजे राम त्यांना अस्पृश्य तर नक्कीच नव्हता. कोणत्याही कामात नैतिकता हा मूलाधार असून प्रत्येकानी विश्वस्त म्हणून भूमिका पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्याग्रहाचे शस्त्र निर्माण केले.

या दोन नेत्यांनी केवळ वैचारिक मांडणी न करता प्रत्यक्ष कृती केली. ज्यायोगे तत्कालीन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस स्वातंत्र्य चळवळीचा आत्मा बनली. या इतिहासातून कॉंग्रेस पक्ष एकतर काहीच शिकला नाही किंवा मग त्यापासून प्रेरणा घेऊन वर्तमान सुधारण्याऐवजी फक्त इतिहासातच रमला.

वर्तमानातील कॉंग्रेस

देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसणे, पक्षातील काही नेत्यांना स्वत:च्या स्वार्थासाठी अजूनही अध्यक्षपदी हव्या असलेल्या परंतु वयोमानाने थकलेल्या सोनिया गांधी अन सततच्या अपयशाने अध्यक्षपद सोडलेले राहुल गांधी, त्यांची खुशमस्करी करणारा गोतावळा आणि हायकमांड नावाच्या अजस्त्र शक्तीसमोर नामोहरम झालेला, हताश झालेला सामान्य कार्यकर्ता हे आहे कॉंग्रेस पक्षाचे  वर्तमान.         

राहुल गांधी माणूस म्हणून उत्तम असले तरी प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्यात काही कमतरता आहेत व आजपर्यत अनेक प्रसंगांनी, निवडणुक निकालांनी ते सिद्ध केले आहे. परंतु पक्षातील नेत्यांना ते मान्यच नाही. आपल्याच सरकारने काढलेला अध्यादेश जो व्यक्ती भर पत्रकार परिषदेत टराटरा फाडतो व ते बघून गपगुमान समर्थन करून जणू काही टाळ्या वाजवणारे नेते ही कॉंग्रेस पक्षाची खरी समस्या आहे. पक्ष सत्तेत असो अथवा नसो पण पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याचा व पक्षाध्यक्ष असताना राहुल गांधी यांचा किती आणि कसा संवाद असतो? आसाम मधील पक्षाच्या अवस्थेबद्दल चर्चा करण्यासाठी आलेल्या हिमन्ता बिस्व सरमा यांना कशी वागणूक मिळाली हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. दिल्लीहून परतल्यानंतर ते थेट भाजप मध्ये प्रवेश करते झाले व नुकतेच त्यांनी आसाम चे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. फक्त कार्यकर्ताच नाही तर पंतप्रधानपदी असताना मनमोहनसिंग यांचे कशा प्रकारे दमन व्हायचे ते संजय बारू यांनी सर्व देशाला सांगितले आहे. युपीए चा काळ गाजला तो धोरणलकवा व भ्रष्टाचाराच्या प्रकरणानी.  

कोणता प्रश्न कोणत्या मार्गाने सोडवावा जेणेकरून कमीत कमी नुकसान होईल असा विचारच कॉंग्रेस पक्षात दिसत नाही. जसे की, अयोध्या सारख्या अत्यंत संवेदनशील विषय न्यायालयाच्या माध्यमातून सोडवला गेला. हाच प्रश्न स्वतः सरकारने सोडवायचा प्रयत्न केला असता तर वातावरण नक्कीच दुषित झाले असते.  

हिंदू-मुस्लीम प्रश्नावर उत्तरे शोधण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ज्या मार्गाचा अवलंब केला तो कॉंग्रेस ने केला असता तर आज परिस्थिती वेगळी असती. टिळकांनी या दोन बाजूत समन्वय साधला. प्रत्येकाने स्वत:चा धर्म अनुसरावा व देशाचे स्वातंत्र्य या मुद्द्यावर दोन्ही धर्मियांनी एकत्र यावे. असे ते धोरण होते.  मात्र अल्पसंख्य मते मिळवायची असेल तर त्यांना नेहमी अनुकूल ठेवले पाहिजे व यासाठी त्यांच्या हिताचे काही न करता फक्त हिंदु धर्मश्रद्धा, देवीदेवता यांच्यावर आघात करायचे. हिंदू म्हणून जे काही जगणे असेल त्याची निंदानालस्ती, कुचेष्टा करायची. दुर्दैव म्हणजे केवळ मते मिळवण्यासाठी अल्पसंख्य तुष्टीकरण हे जणू काही पक्षाचे ध्येयधोरण बनले होते. अल्पसंख्य समाजावरचे हे बेगडी प्रेम आहे. जर खरेच अल्पसंख्य समाजाचे कल्याण करण्याचा हेतू असता तर त्या समाजातील विद्यार्थ्याना आधुनिक शिक्षण देणाऱ्या सुविधा दिल्या गेल्या असता. तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केले गेले असते.  परंतु तसे घडले नाही. देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा असे विधान करणे, रामसेतू प्रकरणात श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करणे. हाच अजेंडा पक्षाने अल्पसंख्य कल्याण म्हणून राबवला व अल्पसंख्य समाजही त्याला भुलला.

टिळक आणि गांधी या दोन्ही नेत्यांनी आपला स्पष्ट असा कृती कार्यक्रम पक्षाला , देशाला दिला. आज कॉंग्रेसपक्षाकडे असा कोणताही कृती कार्यक्रम नाही. पक्षाचे दुर्दैव म्हणजे केवळ मोदीविरोध आणि म्हणून बंगाल मध्ये डाव्यांसोबत आघाडी करूनही एकही जागा मिळालेली नसल्याने चिंतन करण्याऐवजी केवळ भाजपला सत्ता मिळाली नाही म्हणून नेते आनंद व्यक्त करत होते.

भविष्य

एखाद्या परिवाराच्या करिष्म्यावर आधारित असेल्या पक्षाचे हेच दुखणे असते की, त्यांना पक्षांतर्गत  व्यवस्था उभारता येत नाही. पक्षातील सूत्रे आपल्या परीवाराबाहेरील व्यक्तीकडे दिली तर कदाचित त्यांच्या  अतिमहत्वाकांक्षामुळे आपले अस्तित्व संपून आपण बेदखल होऊ ही भीती त्यांना असते. परंतु नवे नेतृत्व उभारले गेले नाही तर पक्षाची वाढ खुंटते जशी कॉंग्रेसची अवस्था होत आहे. अशा कात्रीत घराणेशाही असलेले पक्षनेतृत्व सापडते. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला खरोखर पराभवाचे चिंतन करायचे आहे किंवा पक्षातील धुगधुगी कायम रहावी यासाठीची एक कृती आहे हा खरा प्रश्न आहे.  कॉंग्रेस पक्ष उत्तरोत्तर ग्लानी अवस्थेतून कोमासदृश्य अवस्थेकडे जात आहे. गांधी परिवाराचे दुर्दैव हे की त्याना हे उघड्या डोळ्यांनी बघावे लागत आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणात आमुलाग्र बदल करायला हवा. लोकमान्य टिळकांचा  भारतीय राष्ट्रवाद प्राप्त परिस्थितीत कसा उपयोगी पडू शकतो हे ही तपासले जाणे गरजेचे आहे. खरेतर पक्षाध्यक्षपदी गांधी परिवाराबाहेरचा व्यक्ती अध्यक्षपदी नेमून महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे गांधी परिवाराने कॉंग्रेस पक्षाचे विश्वस्त बनले पाहिजे. वर्षानुवर्षे जागा अडवून बसलेल्या ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शक करण्याची हिंमत गांधी परिवाराने करावी. अशा मार्गदर्शक ज्येष्ठ नेत्यांनी आपला अनुभव, अभ्यास यांच्या आधारावर शासनाच्या धोरणाविरुद्ध पर्यायी कृती कार्यक्रम द्यावा व युवा नेतृत्वाने तो प्रत्यक्षात आणावा. यासाठी युवा नेतृत्वाला वाव दिला गेला पाहिजे. सध्यातरी  महाराष्ट्रातील राजीव सातव हे असे एकमेव उदाहरण दिसते.

ज्या २३ नेत्यांनी पक्षाच्या कारभारासंदर्भात पत्र लिहू नाराजी व्यक्त केली तो तर फुसका बार ठरला. खरेतर त्याचवेळी या विषयावर सखोल चिंतन होऊन नवी दिशा शोधायला हवी होती. मात्र गांधी परिवाराच्या पलीकडे पाहायचेच नाही हाच कृती कार्यक्रम असेल तर पक्षाच्या वाताहातीला कोणीच थांबवू शकत नाही. एकूण काय तर कॉंग्रेस नावाच्या या रुग्णाने आजारी आहोत हे प्रामाणिकपणे मान्य करून त्याचे नेमके निदान शोधून औषधोपचार करावा. केवळ थातूरमातूर औषधीनी रुग्ण वाचण्याची शक्यता फारच कमी.


2 comments:

amol said...

काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झालाय , एकाच घराण्याची हुजरेगिरी करण्याची मानसिकता आणि राहुल गांधी सारखं नेभळट नेतृत्व यामुळे येत्या दशकात हा पक्ष संपून जाईल !

Unknown said...

हा लेख सर्वसामान्य ते राजकीय व्यक्ति अशा सर्वासाठी सहज समजनारा आणि त्यामधुन बरेच शिकवनारा आहे,,तुम्ही आता लोकसत्ता मध्ये देखील लेख लिहावेत अशी माझी इच्छा आहे,,,गिरीश कुबेर सरांचे लेख देखील असेच असतात,,, मला वाटत होते की मि त्यांच्याच एखादा लेख वाचत आहे,,