भस्मासुराचा सोशल अवतार - दर्पण

Tuesday, June 29, 2021

भस्मासुराचा सोशल अवतार


वापरकर्त्यांच्या दृष्टीने लाईक्स, शेअर, कमेंट अन रिट्वीट असे करमणूकीचे साधन असले  तरी करोडोंची उलाढाल असलेल्या ट्वीटर सारख्या सोशल मिडीयाने कंपनीने खोडसाळपणे काश्मीरला भारतापेक्षा वेगळे दाखवून एखाद्या सार्वभौम राष्ट्राला वाकुल्या दाखवल्या अन त्यावर शासनाची काहीच प्रतिबंधात्मक पाऊल दिसत नव्हते. अशाने जनमानसात शासनाची भूमिका हतबलतेची असल्याचेच दिसून येत होते. प्रत्यक्ष रणभूमीवर शत्रूराष्ट्राच्या भूमीवर जाऊन सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या भारताला तरी हे शोभणारे नाही. गहजब झाल्यानंतर ट्वीटर ने तो नकाशा हटवला परंतु हा प्रकार आमच्याकडून चुकून झाला अशी भूमिका अजिबात दिसली नाही. म्हणजेच हे जाणीवपूर्वक केले गेले. कारण काश्मीर हा दोन राष्ट्रातील सर्वात संवेदनशील मुद्दा असल्याने त्यावर खोडसाळपणे केलेली कृती अधिक लक्ष वेधून घेणार याची जाणीव ट्वीटरला असणार यात शंका घेण्याचे कारण नाही. गेली सात दशके काश्मीरचा प्रश्न चिघळत होता. चार मोठी युद्धे व चकमकीत शहीद होणारे शेकडो सैनिकानी  प्राणाची आहुती दिली. ३७० कलम हटवल्यानंतर आता कुठे काश्मीर मोकळा श्वास घेत आहे. त्यातच ट्वीटर चा हा खोडसाळपणा जखम उकरून काढण्यासारख्या आहे. अखेर याप्रकरणी ट्वीटर विरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

विदेशी कंपन्यानी भारतात येऊन करोडोंचा नफा कमवावा यात आक्षेपार्ह काहीच नाही परंतु यासाठी येथील अतिसंवेदनशील मुद्द्याला उकरून काढत स्वत:चा नफा शोधणे हे व्यावसायिक नितीमत्तेला अनुसरून नाही. सोशल मिडीया कंपन्या येथील सत्ताकारण, राजकारण व समाजजीवनाला प्रभावित करण्याची शक्ती प्राप्त करून त्याचा दुरुपयोग करतात ही बाब खटकणारी आहे.

एखाद्या फेक अकाऊन्ट वरून घटनेची शहानिशा न करता तपशील (व्हिडियो, मजकूर फोटो) काही क्षणात वायरल होतो अन त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन निष्पाप नागरिकांच्या जीवित वा वित्तहानीचे प्रसंगही घडू शकतात. ही सोशल मीडियाची शक्ती आहे अन हा सोशल मिडीया जेव्हा व्यावसायिक नफा कमावणाऱ्या कंपन्यांच्या ताब्यात असतो तेव्हा ही नक्कीच गंभीर बाब असते. त्यावर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नाला सोशल मिडीया कंपन्या वाटाण्याच्या अक्षता देतात हे तर देशाच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान समजले पाहिजे. एका अर्थाने हे तर इस्ट इंडिया कंपनीचे व्हर्जन २.० समजले पाहिजे.  

अशाप्रसंगी खरी जबाबदारी देशातील नागरिकांची आहे. आपण करमणूक म्हणून सोशल मीडिया चा वापर करत असलो तरी आपल्या एका युजर अकाऊंट ने सोशल मीडिया ची शक्ती वाढते. जो घटक देशाच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान देतो त्याची खरी शक्ती ही वापरकर्ता आहे. जेवढे जास्त वापरकर्ता तेवढी त्या कंपनीची शक्ती मोठी. याच बळावर सोशल मिडीया कंपन्या देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या कृती करतात, कायद्याची बंधने नाकारतात. आपण भारतीयांनी ओळखले पाहिजे की आपल्याच शक्तीने पुष्ट झालेला हा राक्षस आपल्यासाठीच धोका निर्माण करत आहे. 

पुराणात भस्मासुराची एक कथा सांगितली जाते. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होऊन जाईल असे वरदान भगवान शंकराकडून प्राप्त केलेला भस्मासुर शेवटी भगवान शंकरांच्याच डोक्यावर हात ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. 

ट्वीटर, फेसबुक हे व्यावसायिक नफ्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे भस्मासुरच आहेत. म्हणून ट्वीटर विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने याबाबतीत आता सविस्तर चौकशी होईल.  परंतु राष्ट्राचा एक जबाबदार नागरिक म्हणून सोशल मीडिया वापरताना काही आचारसंहिता पाळली पाहिजे. आपण सोशल मीडिया कंपन्यांचे प्यादे तर बनत नाही आहोत ना याचा विचार केला पाहिजे. अन्यथा उद्या हा भस्मासुर आपल्या डोक्यावर हात ठेवणार यात शंका नाही.

No comments: