धर्मांतरण कशासाठी ? - दर्पण

Thursday, July 1, 2021

धर्मांतरण कशासाठी ?

 


जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातील नागरिक कोणत्यातरी धर्माचा अनुयायी असल्याचे आढळून येईल. व्यक्ती हा जसा सामाजिक प्राणी आहे तसा तो धार्मिक सुध्दा आहे. याचे महत्वाचे कारण असे की, धर्मामध्ये व्यक्तीला दैनंदिन आचरणासंबंधी मार्गदर्शन केलेले असते. बरे वाईट याविषयी काही ठाम मते धर्म तत्वात वर्णिलेले असते. नैतिक मुल्ये हा त्याचा पाया असतो. मानवी आयुष्याला नियंत्रित करणाऱ्या शक्तीविषयी वर्णन असते व त्याचा अनुभव घेण्याविषयी, त्याला जाणून घेण्याविषयी मार्गदर्शन असते. उपदेश असतो. उदाहरणे, दृष्टांत असतात आणि त्यापासून आपल्या आयुष्यातील प्रश्नाची सोडवणूक करण्याविषयी काही उपाययोजना सांगितली असते. कुठलाही धर्म असो त्यात साधारणपणे याबाबींचा समावेश केलेला आढळून येतो. मानवी जीवनात जेव्हा निरनिराळी संकटे निर्माण होतात. अडचणी, दु:ख, अपेक्षाभंग यांनी मानवी आयुष्य गंजून जाते तेव्हा त्या मनाला उभारी देण्याचे काम धर्मातील आध्यात्मिक तत्वे करतात आणि म्हणूनच सर्वसामान्य व्यक्ती धर्माचा आश्रय घेतो. 

आध्यात्मिक दृष्टीने सांगायचे तर व्यक्तीमधील काम, क्रोध, द्वेष, मत्सर, लोभ या विकारांवर विजय प्राप्त करण्यासाठीचा मार्ग म्हणजे धर्म. विकारांवर विजय मिळवून मनुष्यत्वाचा संपूर्ण विकास करणे हे धर्माचे ध्येय. मग कदाचित मार्ग, उपासना पध्दती वेगवेगळ्या असल्या तरी हरकत नाही. स्वधर्ममताचे निष्ठापूर्वक आचरण करताना विरुद्धमतांचा आदर हा धार्मिक जीवनाचा पाया असल्याचे संतपरंपरेने आपल्या आचरणातून दाखवून दिले. माझे मत सत्य आहे तसेच तुझेही सत्य असू शकते  धार्मिक उदारमतवाद. भारतीय संस्कृतीचे हे एक महत्वाचे वैशिष्ट्य. परंतु माझेच मत सत्य आणि म्हणून बाकी सर्व असत्य हा दुराग्रह धार्मिक तेढ निर्माण करतो.  

एक पंथ, एक संत आणि एकच ग्रंथ अशा उपासना पध्दतीत ब्रह्मांडाच्या पसाऱ्याचे ज्ञान कसे संपूर्णपणे कसे मावणार. व्यापक तत्व शोधण्याची जागाच संकुचित असेल तर व्यापकत्व कसे गवसणार ? कदाचित म्हणूनच अशा संकुचितपणाला संख्याबळ वाढविण्याची आवश्यकता भासते.  

धर्म-अधर्म  

नैतिक मूल्यांचे स्मरण ठेवून आपल्या कर्तव्यांचे आचरण असे साधारणपणे धर्माचे स्वरूप समजले जाते. परंतु मानवी आयुष्यात काम, क्रोध, द्वेष, लोभ आणि मत्सर यांच्या आहारी जाऊन व्यक्ती जेव्हा अनैतिक आचरण करू लागतो तेव्हा त्यास अधर्म असे संबोधले जाते. आणि धार्मिक साहित्यात सुद्धा धर्म विरुद्ध अधर्म म्हणजेच नैतिकता विरुद्ध अनैतिकता असाच संघर्ष पाहायला मिळतो. रामायण असो अथवा महाभारत यात धर्म व अधर्म असाच संघर्ष आहे. विशेषत: अनैतिक आचरण करणाऱ्या रक्ताच्या नात्यां विरुद्ध सुद्धा लढाई झाल्या. धर्म रक्षणासाठी म्हणजेच नैतिक मूल्यांच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष रणांगणावर आप्तस्वकीयांवर शस्त्र चालवण्यास प्रवृत्त करणारी परंपरा असणाऱ्या देशात धर्म धार्मिक प्रतीकांपूरता मर्यादित कधीच नव्हता. कदाचित म्हणूनच परकीय आक्रमकांनी खूप प्रयत्न करूनही त्यांना येथे स्वत:चा धर्म स्थापित करता आला नाही. राजकीय सत्ता टिकवण्यासाठी त्यांना स्वत:च्या धर्माच्या अनुयायांची संख्या वाढवणे आवश्यक होते. मात्र येथील धर्माच्या नैतिक अवस्थेतील स्वरूपाने त्यांचे संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न अयशस्वीच राहिले. परंतु अजूनही विविध माध्यमातून धर्मातरण चालूच असल्याचे दिसून येते. बलाच्या आधारावर असो अथवा सेवा प्रलोभनाच्या माध्यमातून असो. धर्मांतराचे प्रकार वारंवार घडत असल्याचेच दिसून येते. उत्तर प्रदेश मध्ये नुकतेच तब्बल 1000 लोकांचे धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आला. आतापर्यत अशा न उघडकीस आलेल्या किती घटना घडल्या असतील याची कल्पनाच केलेली बरी.  

धर्मातरणाच्या प्रेरणा

संख्याबळ वाढले म्हणून ईश्वरत्व अनुभवण्याची प्रक्रिया सुलभ होऊ शकते का ? जेव्हा एकाच धर्माचा अनुनय करणारी डोकी वाढवण्याचे ध्येय असते तेव्हा त्या समूहाला आत्मिक उन्नती प्राप्त करायची नसून व्यावहारिक पातळीवर धार्मिक सत्ता प्राप्त करायची असते. त्यातून परधर्मियाविषयी द्वेष भावना दिसून येते. जर धार्मिक सत्ता प्राप्तीचे ध्येय नसते तर धर्मांतरण करण्याऐवजी माऊलीच्या पसायदानातील विश्वकल्याणाचे अमृतमय शब्दांचे सर्वानी गायन केले असते. परंतु असे होताना दिसत नाही. एकतर तुम्ही आमच्यापैकीच एक व्हा अन्यथा तुम्ही आमचे शत्रू. आणि आम्ही आमच्या शत्रूला संपवून टाकू. ही प्रेरणा धार्मिक असूच शकत नाही ही तर सत्ताप्राप्तीची प्रेरणा आहे. 

धर्म हे सत्ताप्राप्तीचे प्रभावी हत्यार आहे हे इस्त्राईल सारख्या देशाने सिद्ध केले आहे. जगभरात विखुरलेले ज्यू धर्मीय एकत्र होतात आणि इस्त्राईल सारखे एक शक्तिशाली,सार्वभौम राष्ट्राची निर्मिती करतात.   

कितीही मतभेद असले तरी धर्माच्या झेंड्याखाली अनुयायांचे अत्यंत गतीने एकत्रीकरण होते हे उघड सत्य आहे. आणि म्हणून आपल्या धर्माचा अनुनय करणाऱ्यांचे संख्याबळ वाढले की, त्यांना राजकीय मतांसाठी अत्यंत कमी श्रमात तयार करता येते. एकदा राजकीय मतांचा एकगठ्ठा आकडा वाढला की मग धर्महित राष्ट्रहितापेक्षा वरचढ ठरते. देशाच्या घटनेपेक्षा धार्मिक कायद्यांचा आग्रह धरला जातो आणि पुढचा टप्पा म्हणजे राजकीय सत्ता सहजतेने हस्तगत करता येते. त्यामुळे धर्मांतर जेव्हा निव्वळ सत्ताप्राप्तीसाठी असते तेव्हा ते राष्ट्रहितासाठी अधिक धोकादायक असते.

जेव्हा धर्म हा धार्मिक प्रतीकांपुरता मर्यादित होतो तेव्हा संख्याबळाची वाढ म्हणजे धर्माचा विस्तार अशी समजूत दृढ होते. धर्म जर नैतिक मूल्य आणि संस्कारांच्या माध्यमातून समजला तर संख्याबळाची वाढ निरर्थक ठरते.  

अशा परिस्थीतीत सर्व धर्मातील जाणकारांनी पुढे येऊन धर्म हा प्रतीकांपुरता मर्यादित नसून त्याचे नैतिक मूल्यांतील स्वरूप सांगितले पाहिजे. तसेच कुठल्याही माध्यमातून संख्याबळाची वाढ निरर्थक असल्याचे ठामपणे सांगितले पाहिजे. तरच धर्म हा पारलौकिक कल्याणाचे साधन म्हणून टिकून राहील अन्यथा धर्म म्हणजे सत्ता प्राप्तीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे साधन बनून जाईल.