माझ्याविषयी - दर्पण

माझ्याविषयी

नमस्कार,
मी प्रसाद शिवाजीराव जोशी मानवत जि.परभणी येथे राहतो. पारंपारिक शिक्षण बीसीए पर्यंत घेतले. पत्रकारीतेची आवड असल्याने पत्रकारीतेतही पदवी संपादन केली. शालेय जीवनापासून वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण झाली.पुढे वाचकपत्र लिहायला लागलो,नंतर महाविद्यालयात प्रवेश झाल्यावर एका दैनिक सकाळ चा महाविद्यालयीन प्रतिनिधी म्हणून बातम्या पाठवत असे. पुढे दैनिक देवगिरी तरुण भारत मध्ये प्रतिनिधी म्हणून वृत्तपत्रीय लिखाणाला सुरुवात झाली.आमच्या पिढीला मानवत शहराने शारदोत्सव व्याख्यानमालेचा संपन्न वारसा दिला. त्यातून समाजातील वेगवेगळ्या समस्याप्रश्न समजून घेता आले. आमच्या गणेशोत्सव मंडळात  मोठ्या उत्साहाने कार्यक्रम आयोजित केले जायचे. 
महाविद्यालयीन जीवनात सामाजिक संघटनेत सक्रीय झालो. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई येथे काही काळ नोकरी केली. येथील अनुभव फारच समृद्ध होता. खरेतर येथील कामाला नौकरी म्हणताच येत नाही.येथे मी शिकत होतो. मानवत शहरातील वेगवेगळ्या सामाजिकशैक्षणिक उपक्रमात सक्रीय सहभाग असल्यामुळे अनेक अनुभव आले.

दै.पुण्यनगरी मध्ये दर्पण नावाने स्तंभलेखन करता आले. तसेच दिव्यमराठी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकमत,लोकप्रभा, तरुणभारत यांसारख्या अग्रगण्य प्रकाशनांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर लिहिता आले. राष्ट्रीय साप्ताहिक ओर्गनायझर चा प्रतिनिधी म्हणूनही काम केले. माझ्या लेखांचे वाईड एन्गलमधून हे  ई-बुक ई साहित्य प्रतिष्ठान ठाणे यांनी प्रकाशित केले. सध्या मानवत येथील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून काम करत आहे.
तरुणांनी राष्ट्राच्या, समाजाच्या विकासासाठी काही योगदान दिले पाहिजे. स्वत : च्या उपजीविकेसाठी मेहनत केल्यानंतर काही वेळ राष्ट्राच्या विकासासाठी दिला पाहिजे. या वेळात कुठल्याही प्रकारचे विधायक कार्य करता येऊ शकते. आपल्या कुवतीनुसार आपण ते निवडावे व त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. किमान आपण ज्या ठिकाणी काम करतो तेथील कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे. समाजात सर्वत्र अंधार दिसत असला तरी निराश न होता विधायक, सकारात्मक विचारांचा प्रसार करण्यास मोठी  संधी माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीने उपलब्ध केली आहे. या करिता हा ब्लोगप्रपंच.